छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वाळूज येथील साठेनगर भागातून अडीच वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी (दि.४) सायंकाळी घडली असून रात्री दहा वाजता उघडकीस आली आहे.
साठेनगर भागात पवन गायकवाड हे पत्नी कल्पना व मुला-मुलीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान सायंकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास आई स्वयंपाकघरात व्यस्त असताना मोठ्या मुलीसह मुलगा घराबाहेर पडला होता, मात्र चार तास झाले तरीही तो घरी न परतल्याने शोध सुरू केला. न सापडल्याने वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नागरिकांनी परिसरात शोधाशोध सुरु केली. त्यांच्या शेजारीच राहणारी शारदा गणेश शिरसाट (रा. साठेनगर, मुळ गाव अंबरवाडी, जिंतूर, जि. परभणी) हिला घरात शोध घेण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा संशय बळावला आणि ते घरात घुसले. तिला विचारपूस केली असता, तिने दिलीप जाधव (रा. बिडकीन) यांनी सात वाजेच्या सुमारास त्याला पिशवीत घालून घातपाताच्या इराद्याने घेऊन गेल्याचे सांगितले.
दरम्यान पवन गायकवाड आणि नागरिक शारदाला पोलीस ठाण्यात घेऊन आले. तपास अधिकारी पोलीस अंमलदार उत्तम शिंदे यांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने प्रियकर दिलीप जाधव यास संपर्क साधून आपले बिंग फुटल्याचे सांगितले .तथापि, दिलीप जाधव याने सिडको पोलीस ठाण्याच्या आवारात पवनला सोडले आणि पळ काढला.














